नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज दि. २३ सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. यासह अर्थसंकल्पात सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन कर प्रणालीमध्ये ० ते ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. नव्या करप्रणालीत ३ लाख रुपयांपर्यंत करातून सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत करदर संरचना खालीलप्रमाणे सुधारित केली आहे.
0 – 3 लाखांपर्यंत – शून्य
3 ते 7 लाख रुपये – 5%
रु 7 ते 10 लाख – 10%
रु 10 ते 12 लाख – 15%
रु 12 ते 15 लाख – 20%
15 लाखांपेक्षा जास्त – 30%
मानक वजावट ७५ हजार पर्यंत वाढली
नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट ५० हजार वरून ७५ हजार पर्यंत वाढली आहे.
आयकर कायदा १९६१ चा सर्वसमावेशक आढावा घेतला जाईल. ज्यामुळे कर संबंधित वाद आणि खटले कमी होतील. ते ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘२०२४-२५ पर्यंत वित्तीय तूट जीडीपीच्या ४.९ टक्के असण्याचा अंदाज आहे. तूट ४.५ टक्केच्या खाली आणण्याचे लक्ष्य आहे.
मोबाईल फोन आणि उपकरणांचे देशांतर्गत उत्पादन वाढले आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल चार्जरवरील सीमा शुल्क कमी केले जाणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांसाठी आणखी तीन औषधांना सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार आहे. एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरही सीमा शुल्क कमी केले जाईल. सोने-चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्के आणि प्लॅटिनमवरील ६.४ टक्के कमी केले आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ
२५ हजार ग्रामीण वस्त्यांना रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा ४ सुरू केला जाईल. यासाठी सरकारकडून अंदाजे ११ हजार ५०० कोटींची तरतूद.
धार्मिक पर्यटन वाढवण्यावर सरकारचा भर
केंद्र सरकारचे पर्यटन विकासावर विशेष लक्ष आहे. बोधगयाच्या महाबोधी मंदिरासाठी कॉरिडॉर बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. गयाच्या विष्णुपद मंदिरासाठी कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. हे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या विकासावर आधारित असेल. राजगीरच्या तीर्थक्षेत्रांचाही विकास केला जाणार आहे. नालंदाला पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात येणार आहे.