जळगाव : प्रतिनिधी
मित्रांसोबत सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड गेलेल्या गौरव नेरकर (२१, रा खंडेराव नगर) या तरुणाचा दगडावर साचलेल्या शेवाळावरून पाय घसरुन कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. काही तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र गौरव सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री शोधकार्यात अडचणी येत सोमवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले. त्यावेळी गौरवचा मृतदेह सापडला. बनोटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
गौरवचे वडील जळगावात कंपनीत कामाला आहेत. गौरव हा गॅरेजवर काम करुन कुटुंबाला हातभार लावत असे. त्याचा लहान भाऊ शिक्षण घेत आहे. गौरवसह १६ जणांचा समूह सोमवारी पहाटे मंदिरात दर्शन घेवून जळगावला परतीचा प्रवास करणार होते.