भुसावळ : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला डंपर लंपास केल्याची घटना १९ रोजी घडली. तहसील कार्यालयाच्या आवारातून हा डंपर पळविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी पथके तयार केली आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने १२ जुलै रोजी नाहाटा कॉलेज भुसावळजवळ डंपर (क्र. एमएच १९ झेड ५३०१) हा अवैध वाळू वाहतूक करताना पकडला होता. या पथकात मंडल अधिकारी रजनी तायडे, मंडल अधिकारी एस. एफ. खान, मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे, कोतवाल शरद पवार, वाहनचालक विलास नारखेडे हे होते. मात्र हा डंपर दि.१९ जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
रजनी तायडे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीत मंडल अधिकारी रजनी तायडे यांनी नमूद केले आहे की, १९ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत डंपर जागेवर होता, मात्र २० जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता डंपर दिसला नाही. यामुळे डंपर मालक अबू मिर्झा (रा. अजिंठा चौफुलीजवळ, जळगाव) व डंपरचालक समाधान पाथरवट (रा. साकेगाव) यांनी डंपर पळविल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोहेकों सैयद इक्बाल अली इब्राहीम अली हे करीत आहेत.