पुणे : वृत्तसंस्था
अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लहान मुलांनाही नदीत जिवंत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. समरीन निसार नेवरेकर (२५, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), इशान (५), इजान (२) अशी मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी गजेंद्र दगडखैर (३७, मावळ), रविकांत गायकवाड (४१,अहमदनगर), मदत करणारी एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई) येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. समरीन ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत आली होती. पोलिसांना तिचे घराजवळ राहणाऱ्या गजेंद्र याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे आढळले होते.
गजेंद्रला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. समरीन गरोदर राहिली. त्यामुळे तिचा गर्भपात करण्यासाठी गजेंद्रने तिला रविकांत गायकवाड या मित्रासोबत कळंबोली येथे पाठविले. तेथे अमर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाडने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहासह तिच्या दोन्ही मुलांना घेऊन तो परत गजेंद्रकडे आला. ९ जुलै रोजी पहाटे दोघांनी समरीनचा मृतदेह इंदोरी गावातील इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला. हा प्रकार पाहून समरीनची दोन्ही लहान मुले आरडाओरडा करून लागली. दोन्ही मुले रडू लागल्यामुळे त्यांनाही जिवंतपणे नदीत टाकून देण्यात आले. याप्रकरणी तळेगाव गजेंद्र दगडखैर व रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.