मुंबई : वृत्तसंस्था
पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख बनले आहेत असे अमित शहा म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शाह यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. आमचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपराकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या, ”महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शहा यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवता ही येत नाही. अमित शहा यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे”, असा हल्ला सुषमा अंधारे यांनी केला आहे.