पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज आपला वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करीत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर म्हणजेच आताच्या आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे ‘लाडक्या बहिणींसोबत संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
लाडकी बहिण योजनेच्या अर्ज भरताना कोणीही पैशाची मागणी केली तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, कोणाचीही गय केली जाणार नाही. लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज भरण्यासाठी प्रत्येक अर्जामागे सदरील माणसाला पन्नास रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे. त्यामुळे महिलांकडून पैसे मागण्याची आवश्यकता नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या आधी देखील ज्यांनी ज्यांनी महिलांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या पुढे देखील असा प्रकार दिसून आला तर कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. महिलांनी काळजी करण्याचे कारण नाही. चार चाकी दारासमोर उभी असली तरी देखील ती चार चाकी दुसऱ्यांच्या नावावर असेल तर त्या महिलेला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ड्रायव्हर असणाऱ्या महिलांनी देखील काळजी करू नका, आम्ही सर्व महिलांचा विचार करुनच ही योजना आणली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य महिलांसाठी आवश्यक असणारी योजना आम्ही जाहीर केली. मात्र, त्यावरही टीका करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला आहे. लाडकी बहीण योजना वरून होत असलेल्या टिकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्याच बरोबर शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सौर पंप योजनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी आम्ही विज बिल माफ केले असल्याचे देखील ते म्हणाले. इतकेच नाही तर महिला सक्षम असेल तर देश पुढे जाईल, असे म्हणत त्यांनी राज्य सरकार महिलांसाठी कल्याणकारी योजना आणत असल्याचा दावा केला. गेल्या दहा वर्षापासून मी अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे सर्व विचार करूनच मी योजना जाहीर केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.