लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कंत्राटी कामाचे धनादेश काढण्यासाठी पाच टक्के कमिशन मागणाऱ्या रावेर येथील वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार रूपयांची मागणी केली. तडजोडी अंत १ लाख १५ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचून तडजोडीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.