पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली असतांना नुकतेच पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महत्वाच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमित शहा विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली असून 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
या बैठकीसाठी शनिवारीच गृहमंत्री शहा पुण्यात दाखल झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची ही बैठक बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तीन अशी राज्य होती जिथं भाजपाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षफोडीनंतरही भाजपाला चांगले यश मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी केली तर विरोधी मविआला आमदारांच्या बंडखोरीचा फटका बसला. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.