जळगाव : प्रतिनिधी
मुंबई व जळगावात दुचाकी चोरून त्या घेऊन फिरणाऱ्या प्रेम संजय बडगुजर (२०, रा. अयोध्या नगर) व अविनाश दिनकर बागुल (२७, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) या दोघांना रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेत चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत जितेंद्र राठोड, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार हे गस्त घालत असताना रायसोनी नगरमध्ये मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रेम बडगुजर, अविनाश बागुल हे संशयास्पदरित्या दोन दुचाकींवर फिरताना दिसले. त्यांची चौकशी करत त्यांच्याकडे असलेल्या दुचाकींविषयी विचारपूस केली असता एक दुचाकी मुंबई येथून व दुसरी कालिंका माता मंदिरासमोरील हॅपी होम कॉलनी परिसरातून चोरल्याची कबुली दिली. दोघी दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.