मुक्ताईनगर : प्रतीनिधी
पोलिस महासंचालकांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुलीजवळ प्रतिबंधित गुटख्याचा कंटेनर पकडला. तब्बल १ कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. वाहन चालकाला ताब्यात घेऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या किंमतीचा पकडण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. लियाकत अली इस्लाम खान (रा. मेवात, हरियाणा), असे ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे, तर ट्रान्स्पोर्ट चालक सतीश शर्मा (रा. दिल्ली), त्यागी (रा. जयपूर) व मुबारक (रा. दिल्ली) आणि कंपनी मालक नीलू पंजाबी ऊर्फ निशू (रा. भिवाडी, राजस्थान) या चार जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत भारतीय न्यायसंहिता १२३, २७४, २७५ ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याता आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
गुटखा लोड केलेले एक कंटेनर (क्र. एच.आर. ५५ एक्यू ३८७३) मुक्ताईनगरकडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बन्हाणपूर चौफुली येथे या कंटेनरला थांबविण्यात आले. तपासणी केली असता त्यात जवळपास ७६ लाखांचा गुटखा आणि ३० लाख रुपयांची तंबाखू आढळली. पोलिस उपनिरीक्षक अरुण भिसे, तुषार पाटील, विक्रांत मांगडे, विजय बिलगे, प्रमोद मांडली, सुरेश डोंगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
यासंदर्भात सकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. बऱ्हाणपूर चौफुली येथून मुक्ताईनगर शहरातील वरणगाव रोडवर हे कंटेनर पोलिस पथकाने आणले. पथकातील अरुण भिसे यांना विचारणा केली. असता यामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर सकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या आवारात हा कंटेनर आणून खाली करण्यात आला. बऱ्हाणपूर व मध्य प्रदेशच्या सीमेवर मुक्ताईनगर असल्याने या रस्त्याने बऱ्हाणपूर येथून इच्छापूरमार्गे अवैध वस्तूंची तस्करी केली जात आहे. यावर पोलिसांनी नियंत्रण मिळवावे, अशी मागणी पुढे येत आहे.