जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेवर २१ जुन रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पतीला व मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देत शेतात महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी १८ जुलै रोजी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील गावात विवाहिता पती आणि मुलांसह राहत आहे. शेती करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. २१ जुन रोजी दुपारी ३ वाजता महिला व तिचे पती शेतात काम करत होते. त्यानंतर पती हे बियाणे घेण्यासाठी व मुलांना शाळेतून आणण्यासाठी शेतातून गावात निघून गेले. त्यावेळी त्यांच्या गावात राहणारा शंकर रमेश धनगर रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने महिला एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शंकर धनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.