मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ही अत्यंत महत्वाची बैठक असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नसीम खान, विश्वजीत कदम यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानलं जात आहे. या बैठकीत आगामी काळाती विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील किती जागांवर दावा करणार, याबद्दल चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात जास्त 13 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडून सर्वात जास्त जागांची मागणी करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीत काँग्रेस 120 जागांची मागणी करु शकते किंवा त्याबद्दलचा प्रस्ताव ठेवू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
त्यासोबत या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या ७ आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आमदारांवर काही मोठी कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेस हायकमांडकडून विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, तो प्रकार फार गांभीर्यांने घेण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्लीत सुद्धा एक बैठक पार पडली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ५ ते ७ आमदारांवर काँग्रेस निलंबनाची कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसकडून पाच आमदारांवर कारवाई होणार असली तरी इतर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देशही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. दरम्यान कारवाई होणाऱ्या आमदारमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची माहिती मिळते आहे.