चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील राखुंडे नगरातील रहिवासी असलेल्या एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणास तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवीत चारचाकी वाहनातून अपहरण करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेली माहितीनुसार, सटाणा गावाजवळील पेट्रोलपंपावर अपहरणकर्ते गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता या तरुणाने आरडाओरड केल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमुळे या तरुणाची सुटका झाली. या प्रकरणी १८ रोजी अनिकेत महेंद्र उर्फ बाळू मोरे, कृष्णा जिभाऊ झालटे, मेहुल मोरे (सर्व चाळीसगाव) यांच्यासह तीन अनोळखी इसमांच्या विरोधात कलम १०९, १७३ (२), १४० (१), १४० (२), १४२ आणि ६०नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
१७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कल्पेश सुनील पाटील हा तरुण त्याच्या राखुंडे नगरातील घराकडे जात असताना अनिकेत मोरे, कृष्णा या दोघांनी त्यास दुचाकी आडवी लावून दुचाकीवर बसण्यासाठी धमकावले. दुचाकीवर बसवून स्टेशन रोड परिसरातील एका खोलीत नेले. त्या ठिकाणी मेहूल मोरेसह अनोळखी तीन मुले आली. त्यानंतर कल्पेश यास चारचाकी वाहनातून मालेगाव आणि पुढे नाशिक रस्ता मार्गे सटाणाकडे त्याला नेले. यावेळी वाहनामध्ये सटाणा गावाच्या पुढे पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने हे वाहन थांबले असता यावेळी कल्पेश पाटील याने संधी साधून पंपावर आरडाओरड केला. त्यामुळे कल्पेश हा बचावला.