चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सांगवी येथील ऊसतोड मुकादम महादू राठोड यांना संत मुक्ताई शुगर फॅक्टरी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) यांच्याकडील उचलचे पैसे देणे-घेणे असल्याच्या कारणावरून पाच जणांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर संत मुक्ताई शुगर फॅक्टरीत एका खोलीत डांबून ठेवले. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा १६ रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. यात कारखान्याचे शेतकी अधिकारी, कृषी सहाय्यक, ऊस पुरवठा अधिकारी, गेट सुपरवायझर व वाहन चालकांचा समावेश आहे. ही घटना २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकी अधिकारी मुकेश भामरे, कृषी सहाय्यक विठ्ठल तिवटे, ऊस पुरवठा अधिकारी संदीप कोळी, गेट सुपरवायझर नरेंद्र पाटील आणि चालक प्रमोद पंडित (सर्व संत मुक्ताई शुगर फॅक्टरी, घोडसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील महादू बाळू राठोड हे २१ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकीने बेलगंगा साखर कारखाना, मालेगाव रोडवरून जात होते.
त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना मारहाण करून चारचाकी वाहनात बसवून मुक्ताई शुगर फॅक्टरी, घोडसगाव येथे नेण्यात आले. नंतर तेथील एका खोलीमध्ये २१च्या रात्री साडेदहा ते २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान बळजबरीने डांबून ठेवले. यावेळी त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून धमक्या देण्यात आल्या. या आशयाची तक्रार महादू राठोड यांनी ग्रामीण पोलिसात दिल्यावरून संशयित पाच जणांविरुद्ध १६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढील तपास पो. नि. प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.