जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपुरी भागात घरासमोर गप्पा करीत असलेल्या पाच महिलांसह दोन चिमुरड्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या घटनेत शोभा रमेश पाटील (वय ६०, रा. साईप्रसादनगर) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिलांसह दोन चिमुरडे जखमी झाले आहेत. पवन कैलास पाटील (वय २५, रा.सप्तशृंगी नगर) असे संशयिताचे नाव असून त्याने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याने ही घटना घडल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान, या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुरड्यासदेखील दुखापत झाली आहे. सुदैवाने चिमुरड्यांचे प्राण वाचले आहेत. शोभा रमेश पाटील या महिलेचा जागीच मृत्यू झाला. चार महिला गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालक पवन कैलास पाटील याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सेकंडहॅण्ड घेतलेली कार मामाला दाखविण्यासाठी नेत असताना पवन याचा पाय ब्रेकऐवजी अक्सिलेरटरवर पडल्याने ही घटना घडल्याचे समजते. दरम्यान, घटनेनंतर संतप्त जमावाने कारचालक पवन यास बेदम चोप दिला तसेच कारचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.