जळगाव : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील एका धार्मिक संस्थानचे बनावट फेसबुक खाते तयार करून देवी-देवतांसह संस्थान पदाधिकाऱ्याचे छायाचित्र व अन्य आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते १५ जुलैदरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात खाते वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यात असलेल्या या धार्मिक संस्थानच्या नावाने एका जणाने बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यावर देवी-देवतांचे छायाचित्र अपलोड केले. तसेच फोटो स्टोरीमध्ये संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरले. त्यानंतर या खात्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आली. यातून त्या संस्थानची व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाली. या प्रकरणी संस्थानच्या पुजाऱ्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बनावट खाते वापरणाऱ्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (डी), ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार करीत आहेत.