मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात सध्या पावसाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सध्या शोधमोहीम सुरू आहे. जयेश रामचंद्र असे या तरुणाचे नाव आहे. खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने हा तरुण वाहून गेला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
सध्या महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, रविवारी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील शेल्डी धरणात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे 32 वर्षीय तरुण वाहून गेला. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने त्याला अंदाज आला नाही असे या तरुणांसह असलेल्या मित्रांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातील गावातील जगबुडी व नारंगी नद्यांना पूर आल्याने गावागावात पाणी शिरले आहे. शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहेत. खेडजवळील दिवाणखवटी या ठिकाणी रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. परिणामी लांब पल्ल्याच्या काही एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कारण रुळावर पूर्णपणे पाणी आणि चिखल साचला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीपासूनच दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, पावसाची संततधार सुरू असल्याने कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होऊ शकते. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तसेच प्रवाशांनी धीर धरावा, असे आवाहन देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, दरड कोसळल्याने दिवा- रत्नागिरी गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मडगाव जंक्शन-सीएसएमटी-मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी रोड-दादर-तुतारी एक्सप्रेस, मंगळुरु जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत.