जळगाव : प्रतिनिधी
खाद्यपदार्थाची गाडी लावण्यावरून जोरदार वाद होऊन विनोद रामा रायपुरे (२३, रा. सिद्धिविनायकनगर) व त्याचा भाऊ महेंद्र रायपुरे या दोघा भावांना पाच जणांनी मारहाण केली.लोखंडी वस्तू डोक्यात मारल्याने तरुणाचे डोके फुटले आहे. ही घटना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) वसतिगृहाच्या भिंतीजवळ शनिवारी (१३ जुलै) घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आयटीआय वसतिगृहाच्या भिंतीजवळ खाद्यपदार्थाच्या गाड्या लावून अनेक जण व्यवसाय करतात. १३ जुलै रोजी विनोद रायपुरे व त्याचा भाऊ महेंद्र रायपुरे गाडी लावत होते त्यावेळी विजय मनबहादूर गुरखा (रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी), संभा बारी (२८, समतानगर) यांच्यासह गोपाल, शंकर व पीयूष गुरखा नामक पाच जणांनी गाडी लावण्यावरून वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर विनोद रायपुरे हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता घटनास्थळी महेंद्र हा एकटा असताना त्याच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत केली. याप्रकरणी विनोद रायपुरे याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध बीएनएस कलम ११५ (२), ११८(१), ३५१(१) (२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकों अनिता वाघमारे करीत आहेत