जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जात असताना दुचाकी दुभाजकावर धडकल्याने मयूर नरेंद्र पाटील (२४ , रा. विठ्ठलवाडी) हे ठार झाले. अपघात शनिवारी (१३ जुलै) रात्री १२ वाजेच्या सुमारास न्यू, बी. जे. मार्केट समोर झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, खोटेनगर थांब्याजवळ मयूरच्या वडिलांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असून मयूर त्यांना मदत करायचे. शनिवार रात्री दुचाकीने ते बेंडाळे चौकातून पांडे चौकाकडे जात होते. यावेळी त्यांची दुचाकी न्यू, बी. जे. मार्केट समोरील दुभाजकावर धडकली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. रविवारी सकाळी मयूर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे