जळगाव : प्रतिनिधी
शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलवरून जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटून ती थेट झाडावर धडकल्याने आनंद शांताराम सोनवणे (वय ३९, रा. कासमवाडी) हे ठार झाले. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा अपघात रविवारी (१४ जुलै) दुपारी ४:१५ वाजता जळगाव ते शिरसोली रस्त्यावरून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला.
सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक कार्यकर्ते असलेले आनंद सोनवणे हे रविवारी दुपारी त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५, सर्व रा. कासमवाडी) यांच्यासह कारने (एमएच १९, सीझेड १२१२) शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून घरी परतत असताना दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास त्यांची कार झाडावर धडकली. या भीषण अपघातात आनंद या उर्वरित तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांचे मित्र, नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. चौघांना दुसऱ्या वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे आनंद सोनवणे यांना मयत घोषित करण्यात आले तर प्रवीण आढाव यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच योगेश रेंभोटकर यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करून त्यांनाही नंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
कारचा झाला चक्काचूर
कारची झाडाला धडक एवढी जोरात होती की, त्यात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेच कारमधील कोणाला चेहरा, डोके, कानाजवळ व तोंडावर जबर मार लागला आहे. या अपघातात एकजण जागीच ठार होण्यासह अन्य तिघे बेशुद्ध झाले होते.