मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सर्वच पक्षांनी आतापासून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे तर लोकसभा निवडणूक प्रचारात आणि निकालानंतर मोदींच्या ४०० पार घोषणेवर विरोधकांची टीका सुरूच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अबकी बार मविआ २२५ पार अशी घोषणा केली आहे.
भाजपचे उदगीर येथील माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या शरद पवार गटात प्रवेशप्रसंगी आयोजित सोहळ्यात ते म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल. महाविकास आघाडीला विधानसभेत २८८ पैकी २२५ जागांवर यश मिळेल.
वाय बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, महायुतीचे पानिपत होईल याचा स्वप्नातही कुणी विचार केला नसेल. पण जनतेने मविआच्या पारड्यात मते टाकून शिंदे-फडणवीस-पवार त्रिमूर्तीला जोरदार झटका दिला. आता मविआतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचे बळ आले आहे. आपल्या पक्षाला १० पैकी ८ जागांवर यश मिळाले. ही आता खरी सुरुवात आहे, असेही पवार म्हणाले.
ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केला, अशी टीका अजित पवार गटावर करत ते असेही म्हणाले की, लोकसभेनंतर राज्याचे चित्र बदलण्यासाठी अनेक लोक सोबत येत आहेत. उदगीर आणि देवळाली येथून गेल्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यांनी मतदारांचा घात केला.