जळगाव : प्रतिनिधी
आत्याच्या मुलासोबत लग्न ठरले होते. काही महिन्यांत लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, संसार फुलण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याच मृत्यूच्या विरहात असलेल्या तरुणीने विद्युत कॉलनीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. दुहिता विद्युत कॉलनीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. तिचे नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान, नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहिताचे आतेभावाशी लग्न ठरले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला. या मृत्यूचा दुहिताला मोठा धक्का बसला होता. यामुळे ती खूप दुःखी झाली होती.
सकाळी १० वाजता घराच्या एका खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. घटना समजताच कुटुंबीयांनी तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी तपासणीअंती तिला मयत घोषित केले. दरम्यान, गळफास घेण्याआधी दुहिताने आपल्या हातालाही चाकूने कापून घेतले होते. त्यामुळे हातालाही जखम झाली होती. त्यानंतर तिने गळफास घेतला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.