रावेर : प्रतिनिधी
बंद कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागल्याने लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०) या तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना अजंदे येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजंदे येथे हातमजुरी करणाऱ्या संतोष देवराम पाटील यांचा एकुलता मुलगा लक्ष्मण उर्फ गणेश पाटील हा केळीबागेत गुरुवारी बेण्याचे कंद खोदून परतला होता. घरी येताच तो कुलर बंद करुन तो पाणी टाकत होता. त्यावेळी त्याला शॉक लागला आणि तो खाली कोसळला. त्याच्या आईने आरडाओरडा करताच त्याच्या सोबतचे संदीप बिरपन आणि इतरांनी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता महानवार यांनी तपासून मृत घोषित केले. संदीप बिरपन यांनी दिलेल्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.