वरणगाव : प्रतिनिधी
शेतीच्या नफ्याचे पैसे घेण्यासाठी गेला असता सात ते आठ जणांनी एका युवकासह त्याची आई व पत्नीस मारहाण केली. याबाबत वरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ जून रोजी घडली होती. याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी महिला, तिचा पती, रवी भील, नितीन भिल, नरेंद्र भिल, अजय भिल, ताडन भिल व अन्य एक अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कैलास पाटील (२६, रा. पिंपळगाव खुर्द) याचे एका महिलेकडे शेतीचे पैसे बाकी होते. या पैशाबाबत महिलेच्या पतीकडे १९ जून रोजी मोबाइलवरून विचारणा केली असता त्याने ‘माझ्या पत्नीकडे पैसे असून ती आसरा मातेच्या मंदिराजवळ असल्याचे’ त्याने सांगितले. त्यावर अजय तेथे गेला असता त्या महिलेने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली व इतर चार-पाच जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी अजयची आई उज्ज्वला व पत्नी सोनाली तेथे आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात अजय हा गंभीर जखमी झाला होता त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात व नंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुरुवातीला अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजय हा दवाखान्यातून आल्यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे