नाशिक : वृत्तसंस्था
मालधक्का रोडच्या पाठीमागील गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटीलिंक बस डेपोच्या आवारात बसची धडक बसल्याने पाच वर्षाची बालिका जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.१०) घडली. अपघातानंतर बसचालक फरार झाला. त्यामुळे जमावाने सिटीलिंक बसचालक मद्यसेवन करून बस चालवत असल्याचा आरोप केला. तसेच संतप्त जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमावाची समजूत काढत शांतता प्रस्थापित केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सान्वी सागर गवई (५, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, नाशिक रोड ) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. ती पहिलीला शिकत होती. नेहमीप्रमाणे ती शाळेतून तिच्या आजोबांसोबत घरी जात होती. बस डेपोच्या आवारात एमएच १५ जीव्ही ७७१९ क्रमांकाच्या बसचालकाने रस्त्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने बसची धडक बसल्याने सान्वी जागीच कोसळली. अपघातानंतर बसचालक फरार झाला. अपघाताची माहिती समजताच नागरिकांना व मालधक्का परिसरात असलेल्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. डेपो व्यवस्थापनाला अपघाताचा जाब विचारत बसचालक हजर करण्याची मागणी केली. संतप्त युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जमावाची समजूत काढून चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. गवई कुटुंब अतिशय गरीब असून, त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक रोड विभागातील मालधक्का रोडवरील सिटीलिंकच्या बस डेपोत शाळकरी मुलगी बसच्या चाकाखाली येऊन मृत पावल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास घडली. बस डेपोला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे लगतचे नागरिक बस डेपोतूनच ये-जा करीत असतात. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी आहे. त्यांची नात सानवी सागर गवई (वय ५) ही तिच्या आजोबांसमवेत शाळेतून चहाच्या टपरीवर जात असताना हा अपघात घडला. सदर घटनेनंतर बसचालक फरार झाल्याने संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली गेली. सदर प्रकरणानंतर सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर या अपघाताच्या चौकशीचे आदेश सिटीलिंक प्रशासनाने दिले आहेत. मृत चिमुकलीच्या कुटुंबीयांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या सूचना यावेळी सिटीलिंक प्रशासनाने बस ऑपरेटर्सला दिल्या आहेत.