धरणगाव : प्रतिनिधी
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी, यासाठी सर्व सुविधांयुक्त उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामासाठी ४० कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. या रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तत्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतिगृह शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका) असणार आहे.
याबरोबरच नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण, न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटुंब कल्याण सुविधांबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडून मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्राद्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.