जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाकोद येथील १० मजूर फर्दापूर शिवारात शेतात काम करीत असताना मका पिकाच्या कीटकनाशकाच्या स्पर्शातून त्यांना विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून जळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यात सर्व महिला मजुरांचा समावेश आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई तेजराव जोशी (६५), सुनीता अशोक जोशी (३५), ज्योती विलास जोशी (३०), माधुरी शिवाजी जोशी (१६), उर्मिला शिवाजी जोशी (२५), छायाबाई गजानन जोशी (२८) पूजाबाई विजय जोशी (३०), उषाबाई संतोष जोशी (३५), मंगलाबाई शिवाजी जोशी (४०), गुंफाबाई उत्तम जोशी (२७ , सर्व वाकोद) हे फर्दापूर शिवारातील शेतात मजुरीसाठी गेले, यादरम्यान मका पिकाच्या पोंग्यात कार्बोफ्यूरॉन नावाचे कीटकनाशक टाकताना कीटकनाशकाला झालेल्या स्पर्शातून महिलांना उलटी, मळमळ, चक्कर ही लक्षणे सुरू झाली. ताबडतोब त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.