मुक्ताईनगर : प्रतिनिधी
निमखेडी खुर्द येथील प्रसाद गजानन काळे (वय १९) हा आयटीआय झाल्यानंतर झारखंडमधील बिलासपूर येथे रेल्वेत अप्रेंटिसशिप (शिकावू) पदावर काम करीत असताना वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ९ जुलै रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, प्रसाद गजानन काळे हा बिलासपूर (झारखंड) येथे रेल्वेत नुकताच शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला होता. मंगळवारी त्याला वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी रेल्वेचे फिल्टर बदलण्याची जबाबदारी दिली. याप्रसंगी वरिष्ठ तंत्रज्ञ व सहायक यांची उपस्थिती आवश्यक असताना वरिष्ठ तंत्रज्ञ तेथून दुसरीकडे गेला असता, प्रसाद याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. प्रसाद याला वाचवताना एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच इतर शिकाऊ उमेदवारांनी आंदोलन केले. प्रसाद हा आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तीन महिन्यांच्या अप्रेंटिसशिपसाठी तो बिलासपूर येथे गेला होता.