मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात आज दि.१० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हे धक्के जाणवले आहेत. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात हे धक्के जाणवले.या धक्क्याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती. यासह हिंगोली जिल्ह्यातही आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
नांदेड जिल्ह्यात सकाळी 7.15 वाजता हे धक्के जाणवले. तर जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे तीव्र झटके जाणवले.