भुसावळ : प्रतिनिधी
घर घेण्यासाठी १० लाख मिळावे यासाठी छळ होत असल्याने येथून जवळच असलेल्या कुहा पानाचे येथील गजानन भिका वराडे यांची मुलगी जागृती (वय २४) हिने शुक्रवार दि. ५ रोजी मुंबईत आत्महत्या केली. आत्महत्येस सासू आणि नवरा जबाबदार असल्याचा संदेश जागृतीने मोबाइलवर टाकला आहे. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यात (डोंबिवली पूर्व) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने अग्निडाग देण्यास नकार दिल्याने भुसावळ तालुक्यातील कुन्हा पानाचे येथे ७ जुलै रोजी तिचा भाऊ विशाल वराडे याने अग्निडाग दिला.
सविस्तर वृत्त असे कि, जागृती हिचा विवाह जळगाव मधील पिंप्राळा भागातील सागर रामलाल बारी (वय ३२) याच्याशी दोन महिन्यापूर्वी २० एप्रिल २०२४ रोजी भुसावळ येथे झाला होता. गजानन वराडे हे गरीब असतानाही लग्नामध्ये मुलगा सागर याला १४ ग्रॅम सोन्याची चैन, ६ ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली. मुंबईत पोलिस कर्मचारी असलेल्या सागरच्या मित्रांसाठी एसी हॉल बुक केला. जवळपास लग्नामध्ये ७ लाखांपेक्षा जास्त खर्च केला. त्यानंतर मुलगी २१ जून रोजी मुंबई येथे पतीसोबत रहायला जाणार असल्याने आई-वडील पिंप्राळा येथे भेटायला गेले.
तेव्हा मुलीची सासू शोभा रामलाल बारी (वय ५०) हिने मुलीच्या आई-वडिलांना सांगितले की, तुम्ही हुंडा दिला नाही. म्हणून मुलाला मुंबईला घर घेण्यासाठी १० लाख रुपये द्यावे. अशी मागणी केली. परंतु सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे. सध्या पैसा नाही. हंगाम आल्यावर मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईल, असे गजानन वराडे यांनी सांगितले. त्यानंतर मुलगी मुंबई येथे रहायला गेली. दरम्यान, शुक्रवार दि. ५ जुलै रोजी जागृतीने गळफास घेतल्याची माहिती माहेरी मिळाली. आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जागृतीच्या वडिलांनी केली.