जळगाव : प्रतिनिधी
खंडेरावनगर परिसरामध्ये नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय बालक हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली होती. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरामध्ये शनिवारी दुपारी १ ते ५ या वेळेमध्ये दमदार पाऊस पडला. खंडेरावनगरमधील नाल्याजवळ काही मुले खेळत असताना, त्यात सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठलनगर, जळगाव) हा चेंडू घेण्यासाठी गेला असता नाल्यात वाहून गेला होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक तरुण व अग्निशमन दल, मनपा प्रशासनाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले होते. रविवारी सकाळी ७ वाजल्यानंतर पुन्हा एकदा नाल्याच्या विविध भागांमध्ये खंडेरावनगरपासून थेट राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीकडे नाला संपतो, तिथपर्यंत पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले. रविवारी सकाळी या बालकाचा मृतदेह आढळून आला.