जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूरनजीक सोनाळा फाट्याजवळ रविवारी सकाळी ९:१५ वाजता जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह ११ जण जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. जखमी प्रवासी हे बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ही जीप जामनेरहून पहूरकडे येत होती. सोनाळा फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली. यात चालकासह अकरा प्रवासी प्रवास करीत होते. घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय पाटील यांच्यासह नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा हे रस्त्याने असताना अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व सोबतचे इरफान शेख यांनी जामनेरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवून नागरिकांच्या मदतीने जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी प्राथमिक उपचार केले. यातील दोन जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये रफिक बेग इकबाल (५६), शेख शोयब शेख शकील (१८), फायझाबानो शेख फारूख (१६), आलीयासूफी शेख फारुख (१२), हीना कौसर शेख शकील (१४), शाहरुख बेग शफीक (२३), वसीम अहमद रियाज अहमद (३२), अकबरीबी रफिक बेग (४०), तबसू बानो वसीम अहमद (२४), सय्यद इक्राम सय्यद उस्मान (२२), शेख जिनत शेख फारुख (२२, सर्व रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. याबाबत पहूर पोलिस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद झालेली नाही.