जळगाव : प्रतिनिधी
एका वाहनाचा दरवाजा दुसऱ्या वाहनाच्या बॉडीत अडकल्याने झालेल्या नुकसानीच्या कारणावरून दिलीप अर्जुन चौधरी (वय ३१, रा. धरणगाव) या तरुणाला फळविक्रेत्याजवळील लोखंडी वजनमाप घेऊन डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दाणाबाजारात घडली. याप्रकरणी श्रीकांत प्रकाश मोरेकर (वय ३४, रा. हुडको, शिवाजी नगर) व वासुदेव पितांबर माळी (वय ५४, रा. धरणगाव) या दोघांविरुध्द शुक्रवारी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चौधरी व त्याचा भाऊ ४ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मालवाहू टेम्पो घेऊन दाणाबाजारातून बाहेर निघत असताना श्रीकांत मोरेकर याच्या मालवाहू वाहनाचा दरवाजा चौधरीच्या वाहनात अडकला. त्यात नुकसान झाल्याने श्रीकांत याने दिलीप याच्याकडे नुकसान भरपाई मागितली. ती देण्यास नकार दिल्याने वासुदेव माळी याने शिवीगाळ केली. दिलीप तेथून निघून जात असताना श्रीकांत याने टेम्पो समोर दुचाकी आडवी लावून ‘तुला आज जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत दिलीप याला वाहनाच्या खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेजारीच फळविक्रेत्याजवळील असलेल्या लोखंडी वजनकाटा घेऊन डोक्यात घातला. यात दिलीप गंभीर जखमी झाला असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप याच्या फिर्यादीवरून भा. न्या. सं. कलम १०९, १२६ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (३), ३ (५) नुसार गुन्हा दाखल झाला असून श्रीकांत व माळी दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.