जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील पाळसदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूट येथून पाईप चोरी करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात चार जणांना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेले पाईप हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पाडसदड येथील शास्त्री इन्स्टिट्यूट परिसरातून ५७ लोखंडी पाईप चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील चोरटा हा एरंडोल शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा रचून संशयित आरोपी किशोर मोहन माळी वय-२१, रा. माळीवाडा एरंडोल याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केले असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. त्याने ही चोरी तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी रा. एरंडोल आणि एक विधी संघर्षित बालक अशा तिघांनी चोरी केल्याचे सांगितले. आणि हे चोरी केलेला मुद्देमाल राज भगवान गायकवाड वय-१९ आणि समीर उर्फ सनी आनंदा सदाशिव रा. एरंडोल यांच्या दोघांचे ताब्यात दिल्याचे सांगितले.
दरम्यान पथकाने किशोर माळी याला ताब्यात घेतले. त्याच्या सांगण्यानुसार तोताराम उर्फ तुषार हेमंत माळी, राज भगवान गायकवाड आणि समीर उर्फ सनी आनंदा सदाशिव या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेल्यापैकी काही लोखंडी पाईप जप्त केले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, किरण चौधरी ,राहुल बैसाणे, हेमंत पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी केले आहे. पुढील कारवाईसाठी चौघांना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.