मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे यश आले नसल्याने राज्यातील महायुतीमधून राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याची सध्या जोरदार रंगू लागली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. पण या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गत काही दिवसांतील विधानांमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीची हाराकिरी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हाराकिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा भाजपला कोणताही लाभ झाला नसल्याचा दावा या प्रकरणी करण्यात येत आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही या युक्तिवादाला खतपाणी घालणारी विधाने केली. यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.
विश्लेषकांच्या मते, लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना महायुतीत विधानसभेच्या मनासारख्या जागा मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे या मुद्यावरून अडचण होण्यापूर्वीच अजित पवार विधानसभा निवडणुकीत आपला वेगळा मार्ग निवडू शकतात.