चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी जवळपास पावणेतीन लाखांची रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सायबर क्राईम व चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चौगाव येथील बापूराव आधार पाटील (वय ४७) यांच्या चोपडा येथील बंधन बँकेच्या खात्यातून २ लाख ८१ हजार ४२१ रुपये सायबर चोरट्यांनी २७ जूनला दुपारी २ वाजेच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ही रक्कम एकाच वेळेस न काढता ४ ते ५ वेळेस काढली आहे. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजनंतर बापूराव पाटील यांनी बँकेत संपर्क केला असता त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले.
या घटनेनंतर बापूराव पाटील यांनी सायबर पोलीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली असून या संदर्भात बापूराव पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद ही नोंदवली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी ४२० प्रमाणे तसेच सायबर गुन्हे कलम ६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.