मुंबई : प्रतिनिधी
एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आ.एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात केली.
यावेळी ते म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी, गहू, मका, कांदा, ज्वारी व इतर पिके भुईसपाट होऊन शेतकरी बांधवांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसुल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत का व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित करून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड,यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी, गहू, मका, कांदा, ज्वारी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.जळगाव जिल्ह्यात माहे एप्रिल २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस गारपीट व वादळामुळे मुक्ताईनगर, यावल तालुक्यासह आठ तालुक्यात एकूण ८४३६.५९ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीपोटी देय अनुदान रुपये २३३७.७२ लक्ष इतक्या रकमेच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयाकडून प्राप्त झालेला आहे दि ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सामान्य कृत वनस्पती निर्देशांक (NDVT) हा निकष वापरून शेती पिकांचे नुकसान निश्चित करावयाचे असल्याने त्याबाबतची तपासणी स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून करण्यात येत आहे तपासणी नंतर सुधारित अनुदान मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत उचित निर्णय घेण्यात येईल असे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.