अमळनेर : प्रतिनिधी
न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या शेतरस्त्यातून ये-जा करण्यास मज्जाव करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निसर्डी येथील एकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहितीनुसार, निसर्डी येथील विनोद हिंमतराव पाटील (ह. मु, शंकरनगर, अमळनेर) यांचे निसर्डीला शेत आहे. त्यांच्या शेताला लागून चुनीलाल गंगाराम पाटील यांचेही शेत आहे. चुनीलाल यांच्या शेतातून विनोद पाटील यांना ये जा करावी लागते. या कारणास्तव चुनीलाल हे नेहमी त्यांच्याशी वाद करत. त्यामुळे शेती करण्यासाठी हिंमतराव पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार त्यांना न्यायालयाने वहिवाट करण्यास परवानगी दिली. त्यांनी स्वखर्चाने नऊ फुटांचा रस्ता तयार केला.
२८ जून रोजी सकाळी ८ वाजता विनोद पाटील व त्यांच्या पत्नी हे त्याच वहिवाटेवरून शेतात जात होते. त्यांना रस्त्यावर दगड टाकून रस्ता बंद केलेला दिसला. रस्त्यावरील दगड बाजूला करीत असताना चुनीलाल यांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी चुनीलाल यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार संजय पाटील तपास करीत आहेत