जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव रेल्वेस्थानकाजवळ अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळील अप रेल्वेमार्गाच्या खांब क्रमांक ४१९/१०२६ लूप ब्रीजसमोर गोरखपूर-पुणे या धावत्या रेल्वेचा २५ वर्षीय अनोळखी तरुणाला धक्का लागला. त्यात हा तरुण जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिन भावसार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधकांच्या खबरीवरून जळगाव लोहमार्ग पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहेत.