लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील सोनवद परिसरात बेसुमार अवैध डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वनविभाग पोळ्या शेकून आपले पोट भरण्याचे काम सुरू असल्याची ओरड वृक्षप्रेमी आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
एकीकडे राज्य शासन आणि केंद्र शासन वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी भर देत आहे. यासाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत सर्वजण वृक्षलागवड मोहीम राबवित येते. प्रत्येकाने एक तरी झाड जगवावे असे आवाहन करत असतांना दुसरीकडे धरणगाव तालुक्यातील सोनवद व नांदेड परिसरात व्यापारींच्या मदतीने काहीजण डेरेदार वृक्षांची मोठ्याप्रमणावर कत्तल केली जात आहे.
विशेष म्हणजे सोनवद आणि नांदेड परिसरातील शेताजवळील नाला आणि आडोश्यात मोठ्या लाकडांना जाळून त्याचा कोळसा तयार केला जात आहे. हा कोळसा बाहेरील व्यापारी खरेदी करून जिल्ह्याबाहेर नेत असल्याचे प्रकार होत आहे. यात काटेरी सुळबाभूळे, निंब, काटेरी बाभूळ या झाडांचा सामावेश आहे. हा प्रकार घडत असातांना वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
वृक्षांची कत्तल आणि लाकडे जाळून कोळसा तयार करून विक्री होणे हे प्रकार वनविभागाने तातडीने थांबवावे, अशी मागणी परिसरातील नागरीक आणि वृक्षप्रेमी यांनी केली आहे.