जळगाव : प्रतिनिधी
आमदार एकनाथ खडसे हेच भाजप प्रवेशाबाबतच्या घोषणा करत आहेत. आधी म्हटले की निवडणुकीच्या आधी येणार, त्यानंतर म्हटले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर येणार, मात्र अजूनही त्यांचा प्रवेश झालेला नाही. भाजप प्रवेशासाठी खडसेंकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
रविवारी जळगाव विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे हे एकीकडे म्हणताहेत की मी भाजपमध्ये येतोय, दुसरीकडे भाजपवरच टीका करायची ही त्यांची दुहेरी भूमिका दिसून येत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी जर नेत्यांनी संमती दिली आहे, तर मग ‘मुहूर्त काढायचा का…?’ असाही प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
राज्य शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, त्या निर्णयामुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे. त्यामुळे निधी कोठून आणणार, हजारो कोटींचा बोजा पडणार, असे चुकीचे प्रश्न त्यांच्याकडून निर्माण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात चांगल्या योजना राबविण्यात आल्या. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.