जळगाव : प्रतिनिधी
१६ लाख रुपयांची सुपारी घेवून सुरत येथे दोन जणांचा गळा कापून खून करत फरार असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (३८, रा. उमरपाडा, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (२६, रा. तरकुवा डुंगरी फलिया, वापी, गुजरात) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी खुनाची कबुली दिली असून एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील दुहेरी खून प्रकरणात अटक केलेल्या अफजल अब्दुल शेख व प्रज्ञेश दिलीप गामीत या दोघांनी कबुली देताना सांगितले की, सुरतचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी दिल्याने सुरत येथील बिलाल चांदी व अज्जू या दोन जणांचा गळा कापून खून केला होता. ८ जून रोजी ही घटना घडल्यानंतर हे दोघेजण फरार होते.
फरार असलेल्या या दोघांच्या शोधार्थ गुजरात पोलिसांचे ११ पथक त्यांच्या मागावर होते. दोन्ही सराईत गुन्हेगार जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकों अक्रम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोकों सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी गुरुवारी (२७ जून) रात्री १० वाजता सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले