जळगाव प्रतिनिधी । शेड बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला गुरूवारी अटक केली होती. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी जिल्हा न्यायलयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयांची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने गुरूवारी १३ जानेवारी रोजी सकाळी सापळा रचुन लोकसेवक कनिष्ठ लिपीत वसंत बारी याला पंचायत समिती कार्यालयात तीन हजार रूपयांची लाच घेतांना अटक केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी संशयित आरोपी वसंत बारी याला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. वी.बी. बोहरा यांच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहे.