मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आपल्या आमदारासह भाजपला साथ दिली मात्र निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याने अनेक आमदार नाराज असून ते पुन्हा शरद पवार गटात येत असल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांकडून शरद पवारांकडे किती आमदार येतील? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “चर्चेत तर अनेक आहेत, पण शरद पवार गटात येणाऱ्या आमदारांचा आकडा हा 18, 19, 20 च्या पुढे आहे. घ्यायचं कोणाला हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील. काही आमदार खूप आधीपासूनच संपर्कात आहेत. त्यांना अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं जाईल. त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, त्यामुळे काही आमदार तिकडे गेले आहेत. ते आमदार विचाराचे पक्के आहेत, पण भितीपोटी ते तिकडे गेले आहेत, अशा आमदारांचा विचार केला जाईल, असा शरद पवारांच्या स्वभावावरुन मला वाटतोय.”