जळगाव : प्रतिनिधी
औद्योगिक वसाहत परिसरातील गुरुदेवनगरातील पान मसाला, सुगंधित सुपारी साठवून ठेवलेल्या मे. संतोष ट्रेडर्स नावाच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी (२४ जून) छापा टाकला. राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे २१ लाख ९ हजार ६५० रुपयांचा पान मसाला, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. गोदाम मालक अरुण पाटील याच्याविरूद्ध मंगळवारी (२५ जून) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, भरारी पथकातील नागपूर येथील सहायक आयुक्त रो. रा. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी ल. प्र. सोयाम, आर. बी. यादव, जी. बी. मोरे, आर. एस. वाकडे, आर. डी. सोळंके, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी राहुल रगडे व विशाल कोळी यांनी २४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोदाम मालकाशी संपर्क केला. मात्र, ते हजर न राहिल्यामुळे गॅस कटरने गोदामाचे कुलूप तोडून पथकाने गोदामात प्रवेश केला. त्यांना गोदामातील हजेरी रजिस्टरवर मे संतोष ट्रेडर्सचे व तेथे मिळालेल्या एका क्लिनिकच्या फाइलवर अरुण पाटील यांचे नाव लिहिलेले आढळून आले.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोदाममालक अरुण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. नीलेश गोसावी करीत आहेत