यावल : प्रतिनिधी
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी एकजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली असून एका गटातील अठरा आरोपींविरुद्ध तर दुसऱ्या गटातील ११ जणांविरुद्ध अशा २९ जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश मधुकर बिन्हाडे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे. आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाइकाकडून रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जीवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात होत्या. २६ जून रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास बसस्थानकासमोर प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे, निलू सुरेश बारसे व अन्य १६ जणांनी दुचाकी अडवली आणि बंदूक रोखत मारहाण केली. यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विरोधी गटाकडून चंद्रकांत ऊर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सारसर आणि प्रवीण सुरेश बारसे है बसस्थानक परिसरात सफाईचे काम करत होते. त्यावेळी आकाश बिन्हाडे याने सर्वांसमोर हिणवले. तसे करण्यास विरोध केल्याने आकाश आणि त्याच्या ११ साथीदारांनी शिवीगाळ केली आणि मारहाण केली. त्यानुसार आकाश बिन्हाडेसह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली यावल पोलिस तपास करीत आहे.