वरणगाव : प्रतिनिधी
एके ४७ रायफलमध्ये वापरली जाणारी जिवंत काडतुसे वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून बाहेर नेताना एक उपअभियंता बुधवारी रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याविरुद्ध फॅक्ट्ररी प्रशासनाच्या वतीने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश जयसिंग इंगळे (५२) असे संशयिताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेला सतीश जयसिंग इंगळे हा उपअभियंता बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेवणासाठी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्या दुचाकीच्या (एम.एच. १९ ए.टी. १५०४) हेडलाइटच्या कव्हर खाली सुरक्षारक्षक सी. व्ही. भारंबे यांना पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांनी तत्काळ सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना ही माहिती कळविली आणि वरणगाव पोलिस ठाण्याचे एपीआय भरत चौधरी यांना कळविले. त्यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी सतीश इंगळे यांच्याजवळ एके ४७ रायफलमध्ये वापरली जाणारी पाच जिवंत काडतुसे आढळली. कार्यप्रबंधक संभाजी सुधाकर पावडे यांच्या फिर्यादीवरून आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.