छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यात ऋषिकेश विलास राठोड (वय १५ वर्ष ) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरपटत नेऊन ठार केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी निदर्शनास आली.
सविस्तर वृत्त असे कि, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या आहेत. त्या मंगळवार रोजी ऋषिकेश यांच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री साडेसात वाजता जेवन करुन ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईला सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. महाराज नेहमी प्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे आईने ऋषिकेश यास सांगितले. ऋषिकेश हो म्हणाला व लघुशंकेसाठी आश्रमाच्या थोडेबाजुला गेला. बराच वेळ ऋषिकेश दिसेना म्हणून महाराजांच्या आईने ऋषी ऋषी म्हणून आवाज दिला पण काहीच आवाज येत नसल्याने आनंद महाराज आल्यावर आईने त्यांना ऋषी कुठे गेला कुठे कुणास ठाऊक असे सांगितले.
महाराजांनी त्यांच्या घरी फोन लावला तेंव्हा तो घरी आलाच नाही असे सांगितले. घराच्यांनी अगदी धुळ्यापर्यत आणि इकडे थेट छत्रपती संभाजीनगर पर्यंत बरेच सीसीटीव्ही कँमेरे रात्रभर तपासले परंतु ऋषिकेशचा तपास लागला नाही. सकाळी नातेवाईकांनी आश्रमाच्या आजुबाजुला शोधाशोध केली असता ज्या ठिकाणी ऋषिकेश याने लघुशंका केली त्या ठिकाणी कोणीतरी ओडत नेल्याचे निशाण आढळल्याने त्या फरपटीने जात शोध घेत असताना जवळच असलेल्या नाल्यात ऋषिकेश दिसला.
सरपंच राजु बेला राठोड यांच्या नातेवाईकांनी जखमी ऋषिकेशला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुरेद्र सुर्यवंशी यांनी तपासून ऋषिकेशला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र सुर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह दहा वाजता नातेवाईकांच्या ताब्यात दिला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, धीरज चव्हाण, रवींद्र ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने हल्ला करून तरुणाचा जीव घेतल्याने भांबरवाडी गावावर शोककळा पसरली असून, शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा त्या बिबट्याने कोणावर हल्ला करू नये यासाठी तात्काळ त्या बिबट्यास पकडून अभयारण्यात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.