हिंगोली : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुणांना आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने भगव्या फेट्याने गळफास घेतला आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. नापीकी व मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे यात लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील तरुण शेतकरी गजानन काशीनाथ बोखारे यांचे पळसगाव शिवारात शेत आहे. या ठिकाणी असलेल्या चार एकर शेतावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. घरी वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
या शेतात त्यांनी ऊसाची लागवड देखील केली होती. या लागवडीसाठी त्यांनी लोकांकडून हातऊसने पैसे आणले होते. मात्र विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ऊस पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे शेतातच ऊस वाळून गेला. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या परिस्थिततही त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला होता.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय होते. वसमत तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. या शिवाय सभा व इतर बैठकांच्या वेळी त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानेही ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते.
ऊस लागवडीसाठी घेतलेले पैसे कसे परत द्यावे तसेच शासन मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ते बोलून दाखवत होते. त्यानंतर गुरुवारी ता. २० सकाळी त्यांनी त्यांच्या शेतात भगव्या फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता त्या ठिकाणी चिट्ठी सापडली असून नापीकी व मराठा आरक्षणासाठी जीवन संपवित असल्याचे यात लिहिले आहे. याप्रकरणी सुलोचना बोखारे यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार पी. एन. टार्फे पुढील तपास करीत आहेत.