मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद पेटला आहे. त्यात एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. अशी टीका त्यांनी केली आहे.
हाके म्हणाले की, एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची आमची लढाई चालू असताना आमच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलं जात असेल तर आमचे छोटे-छोटे समाज पुढे येणार आहेत का? आमच्या धनगर समाजाचे सर्व नेते आणि आमच्यामध्ये सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्लाही लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
हाके यांनी पुढे संभाजीनगरातील डॉ. तारक प्रकरणावरून देखील जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, डॉ. रमेश तारक सारख्या उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळ फासणं अजिबात योग्य नाही. मात्र त्यांच्यात स्थानिक स्थरावर काय इशू आहेत, त्यांच्या कमिटीच्या लोकांबद्दलचे काय प्रकरण आहेत, तसेच त्याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी घडत असणाऱ्या शासनाने यामध्ये लक्ष घालावे. गृह विभागानेही यामध्ये लक्ष घालावे. आज तोंडाला काळ फासले, उद्या काही अनुचित प्रकार घडू नये. आताची त्यांची वाटचाल त्यांच्यामध्ये घुसमट सुरू असल्याचे दाखवते. म्हणून तेव्हाच अशा घटना घडत आहेत. कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्या माणसाला काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे, असा निशाणा त्यांनी लगावला.